नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर-जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले
अहमदनगर प्रतिनिधी:-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि.१ नोव्हेंबर २०२२ या अहर्ता दिनांकवर आधारित नाशिक विभागीय पदवीधर मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.येत्या १ ऑक्टोबर पासून फॉर्मद्वारे मतदार नाव नोंदणी सुरु होणार आहे. मतदार नाव नोंदणीसाठी अर्जदार हा दि.३१ ऑक्टोबर २०१९ पूर्वीचा पदवीधर असणे आवश्यक आहे. यापूर्वीची यादी रद्द असून पूर्णतः नव्याने मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी विहित कालावधीत प्रसारित करण्यात आलेला अर्ज लिखित स्वरूपात स्वाक्षरीसह भरून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी ही माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रवींद्र ठाकूर, निवडणूक शाखेचे तहसीलदार चंद्रशेखर शितोळे, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, शंकर रोडे, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.