प्रभाग क्रमांक दोन मधील रस्त्यांची नगरसेवकांसह आयुक्तांनी केली पाहणी.
नगर प्रतिनिधी - सध्या पडणाऱ्या मुसळधार पावसाने तसेच गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे प्रभाग क्रमांक दोन मधील नवीन झालेल्या रस्त्यांची पुर्णपणे वाट लागली आहे. गेल्या चार महिन्यांपासून नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार यांनी मनपाकडे याबाबत पाठपुरावा करुन रस्त्याची कामे पुर्ण करण्याची मागणी केली होती.
मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी आज (दि.12) रोजी दुपारी सूर्यनगर, निर्मलनगर, पद्मानगर भागात नगरसेवकांसमवेत समक्ष दुरावस्था झालेल्या रस्त्यांची पाहणी केली. नागरिकांना शाळेतील विद्यार्थ्यांना काय त्रास होतो हे बघितल्यावर डॉ.जावळे यांनी येत्या आठ दिवसांत या भागातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करु, असे आश्वासन दिले.
नगरसेवक सुनिल त्र्यंबके म्हणाले की,आम्ही चारही नगरसेवकांनी स्वच्छ प्रभाग सुंदर रस्ते करण्यासाठी आ.संग्राम जगताप यांच्या निधीमधून प्रभागात मोठ्या प्रमाणावर चांगली कामे झाली होती. गॅस पाईपलाईन कामाच्या खोदाईमुळे चांगल्या कामांवर परिणाम झाला. बाळासाहेब पवार, विनित पाउलबुधे यांनी आयुक्तांना नागरिकांचे प्रचंड हाल होत असून, रोज छोटे-मोठे अपघात होतात; तेव्हा तातडीने रस्त्यांची कामे करावी, अशी मागणी केली.
आठ दिवसांत आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता झाली नाही तर नागरिकांसमवेत आम्हाला मनपात आंदोलन केल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी प्रतिक्रिया निखिल वारे यांनी दिली.