मालवाहतूक करणाऱ्या दोन ट्रक ट्रेलरचा समोरासमोर अपघात दोन जण ठार

Ahmednagar Breaking News
0

मालवाहतूक करणाऱ्या दोन ट्रक ट्रेलरचा समोरासमोरअपघात दोन जण ठार.


अहमदनगर प्रतिनिधी:-विजया दशमीच्या भल्या पहाटे  कोल्हारजवळ लोणी रोडवर साई वीरा पेट्रोल पंपानजीक माल वाहतूक करणार्‍या दोन 40 फुटी ट्रक ट्रेलरची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात  दोन वाहनचालक जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की,  कोल्हारच्या दिशेने जात असलेले ट्रक ट्रेलर ( क्रमांक एम. एच. 23 ए. यु. 2349 ) आणि लोणीच्या दिशेने जात असलेले ट्रक ट्रेलर (क्रमांक एम. एच. 46 ए. आर. 2882) या दोन्ही वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली. दोन्ही वाहनांच्या अग्रभागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या अपघातात  संतोष भाऊ राख (रा. हतोला, ता. आष्टी, जि. बीड) आणि सुनिल हरिदास जायभाये (रा जायभायेवाडी ता. जामखेड जि. अहमदनगर) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची खबर मिळताच लोणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पाटील, पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे हे पोलिस स्टाफ घेऊन घटनास्थळी पोहचले. जखमींना तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही मोठ्या वाहनांची धडक झाल्याने कोल्हार-लोणी रस्त्यावर वाहतूकीची कोंडी होऊ लागली. तात्काळ क्रेनच्या साहाय्याने वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली व वाहतूक सुरळीत करण्यात आली.

सदर घटनेसंदर्भात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 449/ 2022 भारतीय दंड विधान 304 ( अ ), 279, 427 मोटार वाहन अधिनियम 184 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top