गोंदवले महाराज पायी दिंडीचे शिलाविहार येथून उत्साहात प्रस्थान.
नगर, प्रतिनिधी. (30. नोव्हेंबर.) : श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नगर- गोंदवले या पायी दिंडीचे रविवारी सकाळी 8 वा. मोठ्या उत्साहात शिलाविहार येथून प्रस्थान झाले.
पहाटे ‘श्रीं’च्या पादुकास अभिषेक, लघुरुद्र होऊन पालखी सजविण्यात आली. भव्य रथात पालखीचे पूजन दिंडीचालक सुंदरदास रिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. भक्तीमय वातावरणात दिंडी निघाली असून, जय जय राम... जय श्रीराम.. च्या नामगजराने परिसर दुमदुमला.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज मंदिरापासून निघालेली ही दिंडी 9 दिवसात सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथे जाईल. यावर्षी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे. नगरमध्ये ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत झाले. पालखी दर्शनाला गर्दी झाली होती.
दिंडीसाठी सेवाभावी मंडळाचे सदस्य परिश्रम घेत आहेत. सौ.रेखाताई रिंगणे यांनी सर्वांना धन्यवाद दिले.