उमेदवार आयात केला जाणार नाही | भाजपा प्रदेश महामंत्री विजयराव चौधरी यांची घोषणा.
नगर, प्रतिनिधी.(23.फेब्रुवारी.) : भारतीय जनता पार्टी देशात व राज्यात सत्तेत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार देशास व राज्यास विकासाच्या प्रगती पथावर नेण्यास कटीबद्ध आहेत. पूर्ण देशात आता भाजपाचे काम सर्वोच बिंदूवर आहे. येणार्या काळात विधानसभा व लोकसभा निवडणुका येणार आहेत. या निवडणुकांची तयारी शहर व जिल्हास्तरावर पदाधिकार्यांनी सुरु करावी. सर्व सरकारी योजना व फ्रेंड्स ऑफ बीजेपी अभियान शहरात व जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावे. नगर शहरात भाजपाचे उत्तम काम चालू आहे. त्यामुळे नगर शहराचा पुढील आमदार हा भारतीय जनता पक्षाचाच होईल असा विश्वास आहे.
भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यालाच पक्ष न्याय देणार असून आमदारकीसाठी उमेदवार आयात केला जाणार नाही, अशी घोषणा भाजपा प्रदेश महामंत्री विजयराव चौधरी यांनी केली.नगर शहर व दक्षिण जिल्हा कार्यकारीणीची महत्त्वपूर्ण मेळाव्यात भाजपाचे प्रदेश महामंत्री व उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी विजयराव चौधरी यांनी पक्षाच्या पदाधिकार्यांना बुथ सशक्तीकरण, डेटा मॅनेजमेट व उपयोग अश्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व मार्गदर्शन केले.
तसेच फ्रेंड्स ऑफ बीजेपी अभियानांतर्गत फ्रेंड्स ऑफ बीजेपी या नोंदणी केंद्राचे उद्घाटन महामंत्री चौधरी यांनी केले. यावेळी प्रदेश प्रवक्ते प्रा.राम शिंदे, आ. मोनिका राजळे, आ. बबनराव पाचपुते, शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, प्रदेश सदस्य भानुदास बेरड, संघटन सरचिटणीस अॅड.विवेक नाईक, दिलीप भालसिंग, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी उपमहापौर मालन ढोणे, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी शहराध्यक्ष वसंत लोढा, बाळासाहेब महाडिक, महिला आघाडी अध्यक्षा अश्विनी थोरात आदींसह भारतीय जनता पार्टीचे शहरातील व दक्षिण भागातील कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.आ. राम शिंदे यांनी पक्ष संघटना मजबुती विषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी संघटनात्मक कामाची माहिती दिली. ग्रामीण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनीही कामाची माहिती दिली. मल्हार गंधे यांनी सोशल मिडिया अॅप बद्दल माहिती दिली.