ध्रुव ग्लोबल स्कुलचे संपूर्ण रामायण अवर्णनीय.- खा.डॉ.सुजय विखे पाटील.
शिर्डी,प्रतिनिधी.(25. मार्च.) : संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूल चे संगीत संपूर्ण रामायण हा नाट्य प्रयोग अवर्णनीय असाच आहे. अयोध्या मध्ये श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यात याचा प्रयोग निश्चित करण्याचे आश्वासन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिले.
शिर्डी येथे आयोजित महापशुधन एक्स्पो कार्यक्रमात संध्याकाळी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या वतीने संगीत रामायण महानाट्याच्या सादरीकरणा नंतर ते बोलत होते. यावेळी व्यासीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, महानाट्याचे संयोजक डॉ संदीप मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की जाणता राजा या महानाट्या नंतर एवढे भव्य दिव्य आणि इतके सुंदर असे नाटक पाहण्याचा योग आला, श्रीराम यांचे चरित्र रामानंद सागर यांच्या तुलनेनं या नाट्यात सादर केले आहे. कलाकारांचा उत्तम अभिनय , नृत्य, संगीत हे सर्व अप्रतिमच आहे. अयोध्येत २०२४ मध्ये श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्या अत्यंत महत्त्वाच्या सोहळ्यात या महानाट्याचा प्रयोग होण्याची जबाबदारी ही माझी, पंतप्रधान मोदी यांना हा प्रयोग खूप आवडेल अशी मला खात्री आहे असे सांगून या नाटकाची जवाबदारी आता मी घेतो असे सांगितले.
महानाट्याचे संयोजक मालपाणी यांनी या नाट्य निर्मिती मागची संकल्पना विषद करून शाळेच्या सहकाऱ्यांनी अत्यंत मेहनत करून हे महानाट्य निर्माण केले आहे. अयोध्येत याचा प्रयोग व्हावा हिच इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी महानाट्याच्या शेवटी प्रभु रामचंद्राची आरती सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
महानाट्यास शिर्डी सह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.