राज्य सरकार अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी. - ना. राधाकृष्ण विखे पाटील.
राहाता, प्रतिनिधी. (10. एप्रिल.) : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतक-यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे.शेतातील उभ्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे गांभिर्य लक्षात घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुध्दा जिल्ह्यातील शेतक-यांना दिलासा देण्यासाठी येणार आहेत. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सुचना महसूल आणि कृषि विभागाला देण्यात आले असून, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मागील दोन दिवसांपासून तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहाणी मंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमट, जिल्हा अधिक्षक कृषि आधिकारी श्री.जगताप, प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह कृषि आधिका-यां समवेत करुन,शेतक-यांना बांधावर जावून दिलासा दिला. ठिकठिकाणी रस्त्यात थांबलेल्या शेतक-यांशी संवाद साधून शेतक-यांची त्यांनी आस्थेने चौकशी केली.
काढणीला आलेले द्राक्षांचे घड गारपिटीने फुटले आहेत, बाजारात त्याची विक्री होणार नाही, अनेक द्राक्ष उत्पादकांनी व्यापा-यांना बोलावून आपले व्यवहारही ठरविले होते. परंतू यासर्व नैसर्गिक आपत्तीने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागलेल्या शेतक-यांनी आपली कैफीयत अतिशय हाताशपणे मंत्र्यांपुढे मांडली.
यासर्व संकटात राज्य सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे आश्वासित करुन मंत्री विखे पाटील म्हणाले की, कृषि मंत्री असताना नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी विशेष मदतीचे पॅकेज आपण दिले होते. याच धर्तिवर अशी काही मदत द्राक्ष उत्पादकांना करता येईल का याचा विचार मंत्रीमंडळाच्या बैठकीत निश्चित करु. याबाबतची माहिती तातडीने सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी कृषि आणि महसूल विभागाला दिल्या. पंचनामे करतांना गारपीटीचे फोटो आवश्य जोडावे असेही त्यांनी आधिका-यांना सुचित केले.
पाहाणी दौ-यानंतर मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत श्री.साईबाबा संस्थानच्या सभागृहात आढावा बैठकही संपन्न झाली. याबैठकीला राहाता, कोपरगाव, संगमनेर या तीनही तालुक्यांचे महसूल आणि कृषि विभागांचे वरिष्ठ आधिकारी उपस्थित होते. तालुका निहाय झालेल्या नुकसानीची आकडेवारी त्यांनी जाणून घेतली. वादळी वा-याने वीजेच्या ताराही अनेक ठिकाणी तुटल्या आहेत, त्याची जोडणी तातडीने करुन, वीजप्रवाह सुरळीत करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. सर्व नुकसानीचा अहवाल समन्वयाने तयार करावा, मागील नैसर्गिक आपत्तीमधील किती शेतकरी मदतीपासून वंचित आहेत याची माहीतीही त्यांनी या बैठकीत जाणून घेतली.
सातत्याने होणा-या नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक मदत करण्यातही मर्यादा आल्या आहेत. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पिक विमा योजनेचे नवे सर्वकंश धोरण आणले आहे. शेतक-यांना कोणताही आर्थिकभार न देता १ रुपयात विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, या पिक विमा योजनेची व्यापकता वाढवून शेतक-यांना सरंक्षण देण्यासाठी आता पाऊल टाकावी लागणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
आम्ही आयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनाला गेलो असलो तरी, राज्यातील नैसर्गिक आपत्तीकडे कोणतेही दुर्लक्ष आमचे झालेले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्वचजन आज पाहाणी दौ-यासाठी बाहेर पडले आहेत. या नैसर्गिक संकटात टिका टिपण्णी करण्यापेक्षा सरकारला तुम्ही सुचना कराव्यात असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी विरोधकांना केले आहे.