वस्तुनिष्ठ पंचनामे करा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रशासनास सूचना.
पारनेर,प्रतिनिधी.(11.एप्रिल.) : राज्यात अनेक ठिकाणी गारपीट तसेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे,परंतु शेतक-यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे आहे, त्यामुळे तुम्ही खचून जावू नका या पूर्वीच्या नुकसान भरपाई पोटी आता पर्यंत १० हजार कोटी रुपये आपण शेतकऱ्यांना दिले आहेत असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगून पंचनामे तीन दिवसात करा असे प्रशासनास आदेश दिले.
अहमदनगर जिल्ह्यातील वळकुटे तालुका पारनेर येथील गारपीटग्रस्त भागाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल,पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बांधावर जावून पाहणी केली. यावेळी पाहणी करताना शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, एवढंच नव्हे तर घरांची देखील पडझड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. झालेल्या नुकसानीचे गांभिर्य लक्षात घेवून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तीन दिवसात सर्व पंचनामे पूर्ण करावेत,मागील गारपिटीचे पैसे देखील आपण शेतकऱ्यांना दिले आहेत,आता ही या आपत्तीत सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे , खचून जावू नका असा धीर देत एका आठवड्यात ह्या गारपिटीची नुकसान भरपाई देवू असे आश्वासनही त्यांनी दिले. जनावरांना चारा,घराची पडझड झालेल्यांना आसरा या वर तात्काळ कारवाई करावी अशा सूचना यावेळी त्यांनी देताना बांधावर जावून भेट देणारा हा मुख्यमंत्री आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असा दिलासा याप्रसंगी शिंदे यांनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खास गारपीटग्रस्तांना भेट देण्यासाठी आले असून झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या सुचना महसूल आणि कृषि विभागाला देण्यात आले असल्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी कांद्याचे ३५० रुपये अनुदान काही तांत्रिक अडचणी मुळे मिळत नाही ते मिळण्यासाठी काही अटी शर्ती ह्या शिथिल कण्याच्या सूचना केल्या. गारपीट तसच शेतकरी अनुदान या करिता आतापर्यंत पारनेर तालुक्यास १३ कोटी रुपयाचा निधी हा देण्यात आला असून या गारपिटीचे अनुदान देखील लवकरच मिळेल असे सांगून घरची पडझड झालेल्या कुटुंबांना सरकारी जागेवर आसरा देण्यात येईल असे सांगितले.
पारनेर तालुक्यातील वळकुटे गावातील गारपीट आणि अवकाळी पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहाणी करताना नुकसानग्रस्त शेतकरी बबन रामभाऊ काळे, भागा पायगुडे,बाबा मुसळे, बबन मुसळे यांच्याशी चर्चा केली. घराची पडझड झालेले हिरामण बरडे, कचरू वाघ यांना यावेळी दिलासा दिला.यावेळी खा.डॉ.सुजय विखे पाटील, खा.सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमट,यांच्यासह कृषि, आधिकारी,महसूल आधिकरी, यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.