सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांचा ‘रुग्ण मित्र’ पुरस्कार देऊन सन्मान.
याप्रसंगी आ.प्रा.राम शिंदे म्हणाले, समाजातील दु:ख कमी करण्यासाठी अनेक संस्था, व्यक्ती आपआपल्या परिने प्रयत्न करत आहेत. अशा संस्थेचा अनंत बहुउद्देशिय संस्थेने गौरव करुन त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला आहे. सामाजातील दुर्लक्षित घटकांच्या उन्नत्तीसाठी काम करणाराना प्रत्येकाने प्रोत्साहन देणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांचे आरोग्य क्षेत्रातील कार्य सर्वांनाच परिचित आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेले कार्यात सातत्य ठेवणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगितले.
जालिंदर बोरुडे यांनी गेल्या 30 वर्षांपासून फिनिक्स सोशल फौंडेशनच्या माध्यमातून हजारो मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराच्या माध्यमातून दृष्टी देण्याचे काम केले आहे. गोर-गरीबांना मोफत शिबीराच्या माध्यमातून आरोग्य सेवा उपलब्ध करुन देत लाखो रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. नेत्रदान, देहदानाबाबत जनजागृती करुन अनेकांचे संकल्प फॉर्म भरुन घेतले आहे. याप्रसंगी जालिंदर बोरुडे म्हणाले, फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून गोर-गरीब, वृद्धांना मोफत आरोग्य सेवा मिळावी, त्यांचे दु:ख कमी व्हावेत, यासाठी संस्थेच्या माध्यमातून काम सुरु आहे. अनेकांच्या सहकार्याने हे कार्य अधिक व्यापक होत आहे. आज अनंत बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने केलेल्या सन्मानाने आम्हास प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.संस्थेचे अध्यक्ष इकबाल शेख यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत पुरस्कारांर्थींचा परिचय करुन देत सर्वांचे आभार मानले.