स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर जयंती निमित्त फिनिक्सच्यावतीने अवयव दान जनजागृती.
नगर, प्रतिनिधी. (28. मे.) : मनुष्याचे आरोग्य चांगले असेल तर त्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपले अवयव हीच आपली खरी संपती आहे. परंतु अपघाताने अवयव निकामी झाल्यास त्याचे मोठे दु:ख आयुष्यभर राहते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने अवयव प्रत्यारोपण करता येत असल्याने अवयव दान केले पाहिजे. आजही अनेकांमध्ये अवयव दानाबाबत समज-गैरसमाज आहेत, तसेच काही अंधश्रद्धाही आहेत. आज विज्ञान इतके पुढे गेले आहे की, अवयव प्रत्यारोपणाने मनुष्य पुर्वीप्रमाणे काम करु शकतो. त्यासाठी अवयव दानाबाबत जागृती होऊन ही चळवळ व्यापक बनल्यास अनेकांच्या चेहर्यावर हसू असेल. स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी आपले आयुष्य देशासाठी अर्पण केले. आपला देश मजबूत व निरोगी राहण्यासाठी राष्ट्रपुरुषांचे कार्य आपणास प्रेरणा देत असते. हीच प्रेरणा घेऊन फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे प्रतिपादन जालिंदर बोरुडे यांनी केले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त चौपाटी कारंजा येथील त्यांच्या पुतळ्यास फिनिक्स फौंडेशनच्यावतीने अभिवादन करण्यात येऊन अवयव दान संकल्प अर्ज भरुन घेण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष जालिंदर बोरुडे, शंकरराव हिवाळे, आदिनाथ येंडे, संजय देवतरसे, मिलिंद भालसिंग, समर्थ अष्टेकर, बबन केदारे, अर्जुन पाटील आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना जालिंदर बोरुडे म्हणाले, फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात गेल्या 30 वर्षांपासून काम सुरु आहे. मोफत शिबीराच्या माध्यमातून गरजूंना उपचार मिळवून देण्यात येत आहे. नेत्रतपासणी व मोतीबिंदू शिबीराच्या माध्यमातून हजारो लोकांना दृष्टी देण्याचे काम झाले आणि ते अखंडपणे सुरु आहे. त्याचबरोबर अवयव दानाबाबत जागृती करण्यात येऊन अनेकांचे संकल्प अर्ज भरुन घेण्यात येत आहेत. त्यास नागरिकांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नागरिकांबरोबरच युवकांना दिलेला प्रतिसाद आमचा उत्साह वाढविणार आहे. याप्रसंगी आदिनाथ येंडे म्हणाले, नागरिकांमध्ये आरोग्याबाबत व अवयव दान, नेत्रदानाबाबत जागृती करुन लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा उपक्रमात प्रत्येकाने सहभागी होणे आवश्यक असल्याचे सांगितले.यावेळी अवयव दान संकल्प पत्र युवकांसह नागरिकांनी भरुन दिले.