ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही मिळणार कौशल्यपूर्ण प्रशिक्षण.- खा.डॉ.सुजय विखे पाटील.
अहमदनगर, प्रतिनिधी.(21. जून.) : ग्रामीण तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही कौशल्यपूर्ण प्रशिक्षण मिळावे या करिता कोड ऑन व्हील्स हा प्रकल्प कोड टू इन्हान्स लर्निंग ट्रस्ट व जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला,या प्रकल्पाचे आज उद्घाटन करताना मला मनस्वी आनंद होत आहे असे नगरचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
आज कोड ऑन विल्स या अभियानाचे अहमदनगर जिल्हा परिषदेत उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर, कोड ऑन व्हील्सचे राहुल बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ते म्हणाले की ग्रामीण भागात विजेची समस्या , तसेच दळणवळणाची साधने, शिवाय इंटरनेट ची उपलब्धता पाहता या परिसरातील विद्यार्थी हे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेण्यापासून वंचित राहत होती. ही बाब सातत्याने आपल्यास खटकत असल्याने ह्या दृष्टीने हा प्रकल्प राबविण्याचे ठरविले असे सांगून आता दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही कोडिंग आणि थ्रीडी प्रिंटर यांचे प्रशिक्षण दिले जाईल.शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क असल्याने यासाठी हा प्रयत्न आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील दुर्गम भागातील 25 शाळांमध्ये कोड ऑन व्हील्स या व्हॅन द्वारे विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अभिनव प्रकल्पामुळे दुर्गम भागातील विद्यार्थी हे अत्यंत आनंदी झाले असून प्रशिक्षण कसे असेल याची उत्सकता त्यांना लागली आहे.