लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ शासन आपल्या दारी अभियानातून द्यावा.- खा.डॉ.सुजय विखे पाटील.
अहमदनगर,प्रतिनिधी. (23. जून.) : शासन आपल्या दारी या अभियानातून लाभार्थ्यांना त्या त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यापर्यंत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी असून केवळ अर्ज स्वीकारणे इथपर्यंत नाही अशी सूचना खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत केल्या. शासन आपल्या दारी या महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी अभियानात केवळ योजनेसाठी अर्ज स्वीकारणे इथपर्यंतच नको तर,त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ त्या लाभार्थ्यांना मिळायला हवा असे सांगून अभियान यशस्वी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात शासन आपल्या दारी या अभियानाची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर , अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आढावा घेताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या लोक कल्याणकारी योजनेचा विभागनिहाय आढावा घेतला. मागील एक महिन्यात कृषी, शिक्षण, महिला व बालकल्याण, आरोग्य, महसूल, समाज कल्याण, कामगार कल्याण या सारख्या विविध विभागात लाभार्थ्यांनी वैयक्तिक तसेच सामूहिक लाभासाठी अर्ज केले असून केवळ अर्ज न करता त्या लाभार्थ्यांना कशा प्रकारे प्रत्यक्ष लाभ देता येईल या साठी सर्वांनी काम करावे असे खा.विखे यांनी सांगताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठा कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमात लाभार्थ्यांना त्याचे वाटप करावयाचे आहे. महिला बचत गट, शेतकरी, दीव्यांग, वैयक्तिक लाभार्थी या सर्वांना या कार्यक्रमात सहभागी करून त्यांना प्रत्यक्ष लाभ द्यावयाचा आहे. विभागनिहाय प्रत्यक्ष लाभार्थी यांची यादी करून लाभार्थ्यांना या कार्यक्रमासाठी आणण्याच्या सूचना त्यांनी करून याची सर्व जबाबदारी ही संबंधित विभागाने घ्यावयाची असे सांगितले. लाभार्थ्यांची संख्या मोठी असेल तर प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना कार्यक्रमात सहभागी करावे.लोक कल्याणकारी योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्या करिता लाभार्थ्यांना कमीत कमी कागदपत्रात योजनेचा लाभ मिळावा यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करून या यंत्रणच्या माध्यमातून लवकर कामे करावीत. या मुख्य कार्यक्रमा नंतर ही मंडळ निहाय ह्या शिबिराचे आयोजन सुरूच ठेवावे असे या प्रसंगी त्यांनी सांगितले. या आढावा बैठकीस सर्व विभाग प्रमुख, संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.