स्पेशल ऑलिंपिक अहमदनगरची अध्यक्षा म्हणून दिव्यांगाना जागतिक व देश पातळीवर पाठविण्याचा माझा मानस: धनश्री विखे.
नगर, प्रतिनिधी. (30. डिसेंबर.2023.) : स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आज डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिसरात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. स्पेशल ओलंपिक अहमदनगर जिल्ह्याची अध्यक्ष म्हणून धनश्री विखे पाटील ही जबाबदारी अगदी यशस्वीरीत्या पार पाडतील असा मला विश्वास आहे असे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडले. आज विळदघाट येथे दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध खेळाच्या स्पर्धा संपन्न झाल्या या ठिकाणी ते बोलत होते.
स्पेशल ऑलिंपिकच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा डॉ. मेधाताई सोमैया यांच्या शुभहस्ते आज या स्पेशल ऑलिंपिक सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी सदरील केंद्राची पाहणी करून उपस्थित दिव्यांग बंधू भगिनींशी आपुलकीने संवाद साधला. तसेच आयोजित केलेल्या स्पर्धेबद्दल धनश्री विखे आणि कुटुंबीयांचे कौतुक केले.
यावेळी खासदार सुजय विखे उपस्थित असता त्यांनी डॉ. मेधाताई सोमैया यांचे स्वागत करून येथील सेंटरची सर्व माहिती त्यांना दिली. दरम्यान बोलताना खासदार विखेंनी संगितले की, दिव्यांगांच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये असलेले प्रश्न किंबहुना समज ही दूर करून ते देखील किती कार्यक्षम आहेत, समाजामध्ये ते आपल्या कार्यक्षमतेने एक चांगला संदेश देऊ शकतात हे दाखविण्याचा उद्देश या सेंटरच्या माध्यमातून सफल होणार आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे की माननीय सोमैयाताई यांच्या सहकार्याने आणि धनश्री विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव आणि भगिनींना एक चांगली दिशा देण्याचे काम आमच्या माध्यमातून होईल आणि जे काही सहकार्य लागेल त्यासाठी विखे पाटील फाउंडेशन सदैव दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहील असे आश्वासन देखील त्यांनी दिले.
तसेच समाज कल्याण अधिकारी आणि क्रीडा अधिकारी यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगर जिल्ह्यामध्ये जेवढे दिव्यांग केंद्र आहेत, त्या सर्व केंद्रातील विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये जे दिव्यांग बांधव व भगिनी निवडले जातील त्यांना पुढे जाऊन राज्यस्तरीय, देशपातळीवर आणि त्यापुढे देखील योग्य ते प्रशिक्षण देऊन स्पेशल ऑलिंपिकच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपले खेळातील कलागुण सादर करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. या सर्व प्रक्रियेत आपली ही संस्था या दिव्यांग खेळाडूंच्या सोबत असणार आहे असे मत खासदार सुजय विखेंनी मांडले.
तसेच खासदार सुजय विखे म्हणाले की, दिव्यांगांसाठी असलेले हे व्यासपीठ प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचणे आवश्यक आहे. त्यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांनी या कामासाठी पुढाकार घेतला याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले व याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याची देखील ग्वाही त्यांनी यावेळी दिली. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून या सर्व उपक्रमांना यश मिळेल आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना जागतिक स्तरापर्यंत जाण्यासाठी मोलाचे योगदान फाउंडेशनच्या मार्फत दिले जाईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
धनश्री विखे पाटील यांनी देखील बोलताना स्पष्ट केले की, या सेंटरचा उद्देश जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दिव्यांग खेळाडूंना जागतिक दर्जाचे खेळाचे प्रशिक्षण देणे हा आहे. विशेष म्हणजे येथे सहभागी होणाऱ्या खेळाडूंना फक्त खेळाचेच प्रशिक्षण नव्हे तर फिजिओथेरपी, संतुलित आहार, वैद्यकीय सेवा व इतर गोष्टींची सेवा देखील तज्ञ प्रशिक्षकांकडून देण्यात येणार आहे आणि प्रत्येक वर्षी जिल्ह्यातून कमीत कमी २० दिव्यांग विद्यार्थ्यांना जागतिक व देश पातळीवर पाठविण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
याच पार्श्वभूमीवर त्यांनी शुक्रवार दि. २९ डिसेंबर रोजी दिव्यांग बंधू आणि भगिनींसाठी गॅदरिंगचे देखील आयोजन केले होते. विशेष म्हणजे अशा स्वरूपाचा कार्यक्रम हा जिल्ह्यात पहिल्यांदाच साजरा होत असल्याने त्यांना विशेष आनंद होत असल्याचे देखील त्यांनी बोलून दाखविले. तसेच डॉ. मेधाताई सोमैया यांचे वेळोवेळी सहकार्य त्यांना लाभले म्हणून त्यांचे देखील आभार धनश्री विखे यांनी मांडले. यासोबतच खासदार सुजय विखे पाटील अशा निरनिराळ्या उपक्रमांसाठी नेहमीच प्रोत्साहित करत असतात याबद्दल त्यांनी खूप समाधान व्यक्त केले आणि दिव्यांगांसाठी भरीव मदत देखील त्यांच्या वतीने होणार असल्याचे त्यांनी सांगितले.